Ad will apear here
Next
तत् त्वं असि ।


- खिडकीच्या गजाआडून आलेले कवडसे माझ्या पुढ्यात पसरले. त्या अंधाऱ्या आणि थंड झालेल्या जागेला अचानक लकाकी आली. ऊन सावलीचा खेळ सुरू झाला... माझ्या पायाच्या तळव्यापासून ते डोक्यात भिरभिरणाऱ्या असंख्य विचारांपर्यंत... एक उबदार जाणीव दाटून आली. प्रकाशाची चाहूल लागली. मनातलं मळभ नाहीसं झालं आणि त्याची जागा लख्ख सूर्यप्रकाशाने घेतली. मनातले विचार झरझर कागदावर उतरू लागले. जणू त्या गजांमागचे असंख्य सूर्यकिरण काही सांगू पाहत होते माझ्या लेखणीतून... 

- वाऱ्यानेही असाच संवाद साधलाय कधी तरी. सूर्यप्रकाशाइतका थेट नाही; पण संवाद झालाय नक्की! वाऱ्याचं ‘वाहणं’ आणि ‘वागणं’ दोन्हीही अचानक, अनाहूत, अनपेक्षित! कधी अलगद येऊन सुखावणारं, तर कधी वादळ बनून तडाखे देणारं! त्याने रानात घातलेली शीळ कधी ऐकलीये, तर कधी समुद्राच्या लाटांसोबत त्याचं उधाणलेलं रूप पाहिलंय! वादळात कधी त्याने त्याचं विध्वंसकारी रूप दाखवलंय, तर कधी एका अलगद झुळकीतून प्राजक्ताच्या झाडाखाली पखरण केलीय... किंवा कधी एखाद्या वेदनेवर हळुवार फुंकर घातलीये...

- सुगंधाशी सोयरीक करण्याचा तर छंदच लागला होता. या सोयरिकीत सख्खे कोण, चुलत - मावस कोण, सावत्र कोण हे ठरवण्याचा छंद! सोपं होतं हे ठरवणं; कारण सुगंध लहरी नसतात वाऱ्यासारखे! ठाम असतात आपल्याच विश्वात! मोगऱ्याला चुकूनही बकुळीचा गंध येत नाही आणि कस्तुरीला मृद्गंध ठाऊक नसतो. त्यामुळे ‘ठाम’ असलेल्या या गंधांशी आपोआप नातं जुळत गेलं. सुगंधाच्या अनेक छटांनी माझ्या अनेक क्षणांशी नातं जोडलं! गंध माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन गेले!!

- संध्याकाळच्या मावळत जाणाऱ्या वेळेत कधीतरी मारवा ऐकलाय. तो ऐकवत होता रिषभ आणि धैवतवरचे ठेहेराव आणि त्यातून ऐकू येत होती ती वैराग्याची भावना... सूरही किती बोलके असतात नै? कधी हे वैराग्य ऐकू आलं तर कधी... ‘कौन गली गयो श्याम’मधली विरहिणी ऐकली... ‘वैराग्य’ ते ‘विरह’, ‘आर्तता’ ते ‘आर्जव’.. सूर खूप काही सांगत होते. कधी पहाटेच्या भैरवातले स्वर स्वच्छंदपणे विहरत होते.. तर कधी मैफिलीची सांगता करणारी भैरवी हुरहूर लावून जात होती... सुरांना काय सांगायचंय हे कळण्यासाठी ‘कानसेन’ व्हावं लागत हेच खरं!

- संगीतातल्या सुरांशी जो लगाव, तोच साहित्यातल्या शब्दांशी आणि रसांशी! तुलसीदासांच्या दोह्यातली भक्ती असो, किंवा शाहिराच्या पोवाड्यातली शक्ती - दोनही रस मोहवणारे!

नाथांचं ‘दार उघड बये’ ऐकताना जाणवलेला वीररस, समर्थांच्या करुणाष्टकातील कारुण्यरस आणि माउलींच्या ‘नीळिये रजनी’तला अद्भुतरस - तोच लगाव, तीच सलगी, तेच नातं...

कवडशातून दिसलेल्या प्रकाशाशी, प्राजक्ताची पखरण करणाऱ्या वाऱ्याशी, मोगऱ्याच्या सुगंधाशी, भैरवीच्या सुरांशी, शब्दांआड दडलेल्या रसांशी आणि माउलींच्या शब्दांशी जुळलेलं नातं...

या संवेदनांशी ‘जुळलेलं’ नातं आणि -

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचसंवेदनांच्या तरल, सूक्ष्म रूपांच्या माध्यमातून संवेदनातीत असलेल्या परब्रह्माशी असलेलं.. ‘जाणवलेलं’ नातं...

तोच तर आहे... लेखणीतून पाझरणारा, सुरांतून बरसणारा, वेदनेवर फुंकर घालणारा, मोगऱ्यातून गंधाळणारा आणि शब्दांतून सुखावणारा...

सर्वदूर, सर्वसाक्षी, सर्वव्यापक...

तत् त्वं असि ।

- डॉ. अपर्णा बेडेकर 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QUSLCV
Similar Posts
🌈 श्रावणातलं आकाश...🌈 ऊन सावल्यांचे सुंदर कवडसे असतात त्याच्याकडे, क्षणोक्षणी बदलत जात विलक्षण मोहवणारं रूप असतं त्याच्याकडे, ढगांसारखे दाटीवाटीने साठून आलेले विचार असतात त्याच्याकडे... पण हे सगळं सांगणारे शब्द नसतात..
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
पानगळ हे बागडणं, नाचणं, समर्पण, उगवणं, फुलणं, फळणं आणि कोमेजणं‌.... पुन्हा पुन्हा अखंड चालू आहे. परमेश्वराचं अस्तित्व आहे तोपर्यंत! हा चैतन्याचा प्रवाह असाच अखंड वाहत राहील. पानगळीतून वसंत फुलत राहील!!!
आई! आई... तब्बल दहा वर्षं या शब्दाचा कल्पनाविस्तार करण्याचा मी प्रयत्न करतोय. हजारो विचारांचे गुच्छ त्यासाठी आनंदाने समोर येऊन हात जोडून उभे राहत होते. आम्हालाही वापर.. म्हणत! पण काय होत होतं माहीत नाही. आपल्याकडे शब्दांचा पुरेसा साठा नाही, असंच सतत वाटत राहायचं. आज, या क्षणालाही तसंच वाटतंय. पण तरीही ठरवलं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language